अधिकाऱ्यांच्या गावात मुस्लीम दांपत्याला मिळाला ग्रामदैवताच्या पुजेचा मान

पुरंदर, दि. १ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील सासवड – हडपसर रस्त्यावर दिवे घाटानजीक असलेले दिवे हे गाव प्रशासकीय अधिकाऱ्यांचे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथील सीताफळ, अंजीर, वाटाणा यामुळे ते राज्यात परिचित आहे. या गावचे ग्रामदैवत श्री कातोबा मंदिरात पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे ग्रामदेवतेचा अभिषेक आणि श्री सत्यनारायणाची महापूजा एका मुस्लीम दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. यातून या गावाने हिंदू – मुस्लीम सामाजिक ऐक्य इतर गावांना दाखवून दिले आहे.

दिवे गावात प्रत्येक पोर्णिमा गावाच्या वतीने साजरी करण्यात येते. यानिमित्त देवाची महापूजा, अभिषेक करून देवाला नवीन पोशाख तसेच सायंकाळी महाप्रसाद आणि संगीत भजन आदी कार्यक्रम पार पडतात. तर अश्विन अर्थात अधिक महिन्यातील महापूजा करण्याचा मान वर्षानुवर्षे गावच्या बारा बलुतेदारांना देण्यात आला आहे. त्यानिमित्त आज गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी बारा बलुतेदारांच्या वतीने मुस्लीम समाजातील सोहेल मुलाणी आणि सानिया मुलाणी या नवदांपत्याच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. यावेळी ग्रामदेवतेला अभिषेक घालून सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. तसेच देवाला नैवद्य देवून उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला.

यावेळी गावच्या माजी उपसरपंच रुपाली झेंडे, गावचे जेष्ठ कार्यकर्ते गणपत शीतकल, दस्तगीर मुलाणी, नजीन भाई मुलाणी, मंदिराचे पुजारी दिगंबर दिवेकर, गणेश दिवेकर, निलेश झेंडे, रेखा झेंडे, पूनम झेंडे, तसेच बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा