नाशिक, १ डिसेंबर २०२२ नाशिक शहरात आजपासून पुन्हा एकदा दुचाकी चालकांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. गाडी चालवताना हेल्मेट न घातल्यास मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होणार आहे. यासोबतच पाचशे रुपयांचा दंडही आकाराला जाणार आहे.
नाशिकमधील हेल्मेट सक्तीची मोहीम तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीनंतर थंडावली होती. मात्र, आता पुन्हा मोहिमेला सुरुवात झाली असून आजपासून शहरात हेल्मेट न वापरणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.
- वर्षभरात हेल्मेट न घातल्याने ८३ चालकांचा मृत्यू
याबाबत बोलताना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सांगितले की, हेल्मेटचा वापर न केल्यामुळे ८३ चालकांचा दुर्दैवी मृत्यू तर २६१ जण गंभीर जखमी झाल्याची पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ही कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
- हे आहेत हेल्मेट चेकिंग पॉईंट
नाशिक पोलिसांकडून शहरातील चेकिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहेत. आज शहरातील स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट, एबीबी सर्कल, अशोक स्तंभ, गरवारे पॉईंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको कॉलेजसमोर चेकिंग होणार आहे. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत गाड्यांची चेकिंग होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक