नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे खानदेशची संस्कृती प्रकटली
नाशिक, २३ डिसेंबर २०२२ : मुक्ताबाई, साने गुरुजी, बहिणाबाई, बालकवी, ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व देणाऱ्या खानदेशला अतिशय संपन्न आणि वैभवशाली संस्कृती लाभली आहे. या संस्कृतीचा अभ्यास व्हावा, तेथील संस्कृतीचे दर्शन घडावे, यासाठी आमदार सीमा हिरे यांच्यायर्फे ता. २२ ते २५ डिसेंबरदरम्यान ठक्कर डोम येथे खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चारदिवसीय सांस्कृतिक महोत्सवातून नाशिकमधील खानदेशवासीयांना खानदेशच्या अद्वितीय संस्कृतीचे विविध पैलू अनुभवता येणार आहेत. महोत्सवामध्ये विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभाग यांचे कृषी, पर्यटन, पुरातत्त्व आदी माहितीपर स्टॉल्स असतील. खानदेशमधील किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक ठिकाणे, पर्यटनस्थळे यांबाबतची सविस्तर माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे.
खानदेशची संपन्न संस्कृती उलगडणाऱ्या खानदेश महोत्सवाला मिरवणुकीने प्रारंभ करण्यात आला. मुख्य मंडपात मान्यवरांच्या हस्ते जाते फिरवून आणि अहिराणी ओव्या गात महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ठक्कर डोममध्ये येत्या २५ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. त्याच्या उद्घाटनानिमित्त आमदार सीमा हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून विजयनगर येथून मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. वाघ्या-मुरळी पथक, बोहाड्यातील सोंगांचे आदिवासी समूहनृत्य, ढोलपथक विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, डोंबाऱ्यांचे खेळ, कानबाईची गाणी, लेझीम पथक याशिवाय बैलगाडी, उंट, घोडे आणि चित्ररथ आदींचा समावेश असलेल्या मिरवणुकीने सिडकोवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विजयनगर येथून निघालेली मिरवणूक महाकाली चौक, पवननगर, रायगड चौक, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलमार्गे तीन तासांनंतर ठक्कर डोम येथे पोहोचली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जाते फिरवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी अहिराणी भाषेतली जात्यावरची ओवी सादर केल्याने कार्यक्रमात आगळी रंगत भरली गेली.
महोत्सवाच्या आयोजिका आमदार सीमा हिंरे यांनी प्रास्ताविकातून माणसं जोडणारा आणि अहिराणी भाषा, खानदेशी संस्कृती, परंपरा यांची नाशिककरांना ओळख व्हावी म्हणून हा महोत्सव करण्यात आल्याचे नमूद केले. महोत्सवाच्या संयोजिका रश्मी बेंडाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक योगेश हिरे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, माजी नगरसेविका अलका आहिरे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आहाड, माधुरी बोलकर, छाया देवांग, इंदुमती नागरे, माजी नगरसेवक भगवान दोंदे, श्याम बडोदे, राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, शहर सरचिटणीस जगन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर अहिराणी साहित्य संमेलन आणि बहुभाषिक कविसंमेलन झाले.
असे असतील कार्यक्रम
२३ डिसेंबर : सकाळी ९ वाजता महिलांसाठी भजन स्पर्धा. संध्याकाळी सहा वाजता न्यू होम मिनिस्टर, चला पैठणी जिंकूया व फॅशन शो.
२४ डिसेंबर : सकाळी १० वाजता टॅलेंट शो, नृत्य स्पर्धा. संध्याकाळी ६ वाजता लोककला व लावणी महोत्सव. भरत गणेशपुरे, हेमांगी कवी, मानसी नाईक, योगेश शिरसाठ सहभागी होणार
२५ डिसेंबर : संध्याकाळी ६ वाजता गायक शंकर महादेवन यांची शानदार मैफल. ‘खान्देश रत्न पुरस्कार वितरण सोहळा’ होणार आहे.
यांचा होणार सन्मान
सी. आर. पाटील (भाजप प्रदेशाध्यक्ष गुजरात), विजय सूर्यवंशी, दिलीप कोठावदे, शाहु खैरे, कुंदा बच्छाव, बुधाजी पानसरे, मनोज कोतकर, सत्यजीत बच्छाव, बाळासाहेब घुगे, संजय धोंडगे महाराज, रायमा शेख, सागर मटाले
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील