पुणे, २३ ऑगस्ट २०२०: सध्या पुणे हे कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त रुग्ण पुण्यामध्ये आढळले आहेत. याआधी मुंबई हे शहर कोरोनाचं हॉस्पॉट ठरलं होतं. मात्र, आता पुण्याने मुंबईला देखील मागे टाकत या बाबतीत पहिला क्रमांक मिळवला आहे. पुण्यातील वाढती समस्या पाहता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते.
या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांत बांधून पूर्ण केलं आहे. आज याच रुग्णालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण करण्यात आलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पीएमआरडीएचे सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी