मडगाव, ३ जून २०२३: गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा मडगाव स्थानकावरील उद्घाटन सोहळा ओडिशातील कोरोमंडल एक्स्प्रेससह ३ गाड्यांना झालेल्या अपघातामुळे रद्द करण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करणार होते. गोवा वंदे भारत ट्रेन उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता यासाठी उद्घाटनाची नवी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. लवकरच त्याच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर केली जाईल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातील अपघातस्थळी रवाना झाल्यानंतर उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगर येथे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात तीन वेगवेगळ्या मार्गांवर झालेल्या अपघातात किमान २५३ लोक ठार आणि ९०० जखमी झाले.
आज शनिवारी सकाळी १०.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविल्यानंतर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव स्थानकांवर आठवड्यातून सहा दिवस ७ तास ५० मिनिटांत थांबणारी ही पहिली ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन होती.
गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे अधिकृत तिकीट दर अद्याप जाहीर झालेले नाहीत. मात्र, तिकिटाची किंमत सुमारे १,४०० रुपये असेल अशी अपेक्षा आहे. ट्रेनच्या वेगवेगळ्या वर्गानुसार तिकीट दरात बदल होऊ शकतो.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड