अयोध्या, २ जून २०२३: अयोध्येत उभारल्या जात असलेल्या अतिभव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण येत्या २६ जानेवारीच्या आधीच होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने डिसेंबर ते २६ जानेवारी मधील वेळ देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली जाणार असल्याचे सांगितले आहे. कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत शरयूतीरी भव्य राम मंदिराची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
रामजन्मभूमी आणि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंदिर उभारणी आणि श्रीरामांची देखणी मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. ते पूर्ण झाले की, डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. २६ जानेवारीच्या आधी मंदिराचे उद्धाटन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीतील तारीख देण्याची विनंती ट्रस्ट करणार आहे.
चंपत राय यांनी सांगितले की, रामलल्लच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. कर्नाटकचे डॉ. गणेश भट, जयपूरचे सत्यनारायण पांडेय आणि कर्नाटकचे अरुण योगीराज हे तिघे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून मूर्ती साकारत आहेत. आणि हे सर्व काम लवकरच पूर्ण होईल. व उद्धाटनही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती चंपत राय यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर