मुंबईत पावसाची संततधार, सकल भागात साचले पाणी, झाड पडून तरुणाचा मृत्यू

मुंबई २८ जून २०२३: मुंबई शहर व उपनगरात पावसाची संततधार सुरू असून, सकल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित होऊ नये म्हणून पालिकेने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्याकरिता महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान मामलेदारवाडी जंक्शन, मालाड येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाड पडून कौशल दोशी (वय ३८) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचाऱ्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मुंबईत सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. आठ ते बारा वाजेपर्यंत पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या काळात पश्चिम उपनगरातही ४० मिमी पाऊस झाला आहे. सकल भागात पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सिग्नल बिघाड झाल्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या विलंबाने धावत आहे.

मुंबई शहर व उपनगरात आगामी दोन दिवस जोरदार व अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी तुंबून जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी, पालिका आयुक्त चहल यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावर, वाकोला मिनी पंपिंग स्टेशन, धारावी टी जंक्शन, गांधी मार्केट, हिंदमाता येथे जाऊन उपाययोजनांची पाहणी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा