मुंबई, २९ ऑक्टोंबर २०२२: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काल पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
आज सकाळी किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, किशोरी पेडणेकरांना आज पुन्हा दादर पोलिस स्टेशनमध्ये यावे लागणार. दादर पोलिस स्टेशनमध्ये १२ एसआरए फ्लॅट्सच्या विक्री प्रकरणी चौकशी सुरु आहे. किश कार्पोरेट कंपनीविरुद्ध मरीन लाईन पोलिस स्टेशनमध्येही चौकशी सुरु आहे. या कंपनीला बीएमसीचं कोविडमध्ये कंत्राट मिळालं होतं. माझी यासंदर्भातील याचिका असल्याचं सोमय्यांनी सांगितले आहे.
पेडणकरांवर आरोप काय
किशोरी पेडणेकरांनी गरिबांचे गाळे ढापले होते ते त्यांना भाऊबीज निमित्ताने परत करावे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मी एसआरएला पत्र पाठवलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टीधारकांच्या नावाने ढापले आहेत. त्यांनी ते अजूनही परत केलेले नाहीत असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
एसआरए’मध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई झालेली आहे. या चौकशीतून किशोरी पेडणेकर यांचं नाव पुढं आलं होतं. काल पेडणेकरांची पंधरा मिनिटं चौकशी झाली. त्यानंतर आज पुन्हा दादर पोलिसांनी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावलं आहे.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एसआरए घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली होती. या गुन्ह्यांत आतापर्यंत किशोरी पेडणेकरांचं नाव नव्हतं पण भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, SRA घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी पेडणकरांची चोकशी केली आहे.
त्यामुळे येत्या काळात पेडणेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे