आरक्षणाची कसलीही अट नाही….
इंदापूर, दि. १६ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून तसेच नव्याने १ ग्रामपंचायत स्थापन झालेल्या अशा एकूण ६२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरू आहेत.
इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याने एक विशेष परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये प्रशासक नेमण्यासाठीचे निकष ठरविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रशासक म्हणून जी व्यक्ती निवडली जाईल ती त्या गावची रहिवाशी असून त्याचे नाव त्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच मुदत संपलेल्या सरपंच आणि सदस्यांना प्रशासक म्हणून निवडता येणार नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जे अधिकार सरपंचांना आहेत ते सर्व अधिकार प्रशासकास प्राप्त होतील. विशेष बाब म्हणजे प्रशासक ही पर्यायी व्यवस्था असल्यामुळे हे पद कोणत्याही प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार नसल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. याचाच अर्थ असा की आता फक्त धनदांडगे आणि पुढाऱ्यांच्या मर्जीतील लोकांचीच संबंधित ठिकाणी प्रशासक म्हणून नियुक्ती होणार हे नक्की.
मात्र या सर्व नियमांमधून एक स्पष्ट होत आहे की यामध्ये महिलांसाठी विशेष कसलीही तरतूद केली नाही. महिलांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण असताना मात्र या निमावली मध्ये त्यांना कसलेही स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडीमध्ये मात्र महिला मागे पडल्या आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने मात्र धनदांडगे लोकच प्रशासक होणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे आता इंदापूर तालुक्यात धनदांडग्यानि आपल्या नेत्यांना पयघड्या घालण्यास सुरुवात केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे