इंदापूर, ९ ऑगस्ट २०२०: बारामती – इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील अविनाश संजीवन शिंदे हा नुकताच भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. देशात २२६ वा क्रमांक मिळविला आहे. अविनाश याने अत्यंत खडतर परिस्थितीत हे यश मिळवले आहे.
अविनाश शिंदे या तरुणाने अभियांत्रिकी पदवी घेऊन खाजगी कंपनीत तीन वर्ष नोकरी केली आहे .अविनाश याने या नोकरीचा राजीनामा देत भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी अविनाश यांनी थेट दिल्लीला जाऊन अभ्यास केला. २०१६ मध्ये अविनाश यांची आय.आर.टी.एस (इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस) पदी निवड झाली होती.
त्यानंतर २०१७ मध्ये आय.आर.एस (असिस्टंट कस्टम कमिशनर) पदी त्यांची निवड झाली. मात्र प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अविनाशचे स्वप्न होते. यासाठी खूप खडतर प्रयत्न व चिकाटीने अभ्यासाला सुरुवात केली. २०१९ मध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत चिकाटीने अभ्यास करत यूपीएससीच्या परीक्षेत त्यांनी आय.ए.एस. होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
अविनाश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पवारवाडी व माध्यमिक शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी येथे झाले. तर पुढील शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे पूर्ण केले. याच महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये बी.ई मेकानिकल पदवी घेतली. कॉलेेज सुरू असतानाच कॉलेज कॅम्पस मध्ये निवड झाली. या सर्व प्रवासात कुटुंबियांची मोठी मदत झाल्याची शिंदे यांनी न्यूज अनकटच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव