पुणे, ८ सप्टेंबर २०२३ : भारत विरुद्ध पाकिस्तान १० सप्टेंबर रोजी आशिया कप २०२३ मध्ये परत भिडणार आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २ सप्टेंबर रोजी रद्द करावा लागला. पावसामुळे सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांचे १-१ गुण झाले. सुपर-४ टप्प्यात भारताला एकूण तीन सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेच्या सुपर-४ टप्प्यात भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
गेल्या १० वर्षांपासून भारत-पाक संघ फक्त आशिया कप किंवा विश्वचषक स्पर्धेतच भिडले आहेत. या दोन देशांदरम्यान बऱ्याच काळापासून एकही मालिका खेळली गेली नाही. आशिया चषक हा एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारात खेळला जातो.
भारताने वनडे फॉरमॅटमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान १४ वेळा खेळले आहेत. या १४ सामन्यांमध्ये भारताने ७ वेळा तर पाकिस्तानने ५ सामने जिंकले असून २ सामने रद्द करण्यात आले आहेत.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारताने संघाची घोषणा केली असून लवकरच पाकिस्तानही संघाची घोषणा करू शकतो असे मानले जात आहे. वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ७ सामने झाले आहेत. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडून चाहते मोठ्या अपेक्षा घेऊन बसले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड