दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाचा ९९ धावानं केला पराभव

इंदौर, २५ सप्टेंबर २०२३ : भारताने रविवारी येथे दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलिया २१७ धावांवर ऑलआऊट झाला. २९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जडेजाने सीन अॅबॉटला बाद करून डाव संपवला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव पावसामुळे ९ षटकांनंतर थांबला.

त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून त्यांना ३३ षटकांत ३१७ धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर कोणताही खेळाडू टिकू शकला नाही. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ २१७ धावा करू शकला. अश्विन आणि जडेजाने भारताकडून गोलंदाजीत कमाल केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णाला २ आणि शमीला १ विकेट मिळाली. भारताच्या खेळीत गिलने ९७ चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या, तर अय्यरने ९० चेंडूत ११ चौकार आणि तीन षटकारांसह १०५ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली.

कर्णधार केएल राहुल (३८ चेंडूत ५२ धावा, तीन चौकार, तीन षटकार) आणि सूर्यकुमार यादव (३७ चेंडूत नाबाद ७२ धावा, सहा चौकार, सहा षटकार) यांनी अर्धशतके झळकावून भारताला मोठी धावसंख्या गाठून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या शानदार खेळीमुळे ५० षटकांत ५ बाद ३९९ धावा झाल्या. ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीनने दोन विकेट घेतल्या मात्र त्यासाठी त्याने १०३ धावा खर्च केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१३ मध्ये त्याने बेंगळुरूमध्ये सहा विकेट्सवर ३८३ धावा केल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा