दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा आयर्लंडवर विजय

पुणे, २१ ऑगस्ट २०२३ : काल भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात द व्हिलेज स्टेडियम, डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला. IRE vs IND टी-२० मालिकेमध्ये ३ सामन्यांच्या सलग दुसऱ्या विजयासह, टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहने त्याच्या नेतृत्वाखालील पहिल्याच मालिकेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८५ धावा केल्या आणि आयर्लंडला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य दिले.

भारताकडून रुतुराज गायकवाडने ४३ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावांची शानदार खेळी केली. संजू सॅमसन हा संघासाठी दुसरा सर्वात मोठा धावा करणारा फलंदाज ठरला. संजू सॅमसनने २६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४० धावा केल्या.

आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच फलंदाजीसाठी उतरलेल्या स्फोटक रिंकू सिंगने संघासाठी तिसरी मोठी इनिंग खेळली. रिंकू सिंगने २१ चेंडूत २ चौकार आणि ३ अप्रतिम षटकारांच्या मदतीने ३८ धावांची धडाकेबाज खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचे खाते उघडले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रिंकू सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण त्या सामन्यात त्याची फलंदाजी आली नाही.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयरिश संघानेही चुरशीने लढत दिली. पण टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजी आणि तगड्या क्षेत्ररक्षणासमोर आयर्लंडचा संघ लक्ष्य गाठू शकला नाही आणि २० षटकांत ८ गडी गमावून १५२ धावाच करू शकला आणि ३३ धावांनी पराभूत झाला.

आयर्लंडकडून संघाचा सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. या सामन्यात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला.

पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी त्याच द व्हिलेज स्टेडियम, डब्लिन मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये भारताने बाजी मारली. आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला आहे. संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहला या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना जिंकून या मालिकेत क्लीन स्वीपसह आपल्या कर्णधारपदाच्या विक्रमात आणखी एक विक्रमाची भर घालायची आहे. युवा भारतीय फलंदाज रिंकू सिंग, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज पदार्पण केलय, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा