आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने मलेशियावर ५-० ने केली मात

चेन्नई, ७ ऑगस्ट २०२३ : विजयी मार्गावर परतताना, भारतीय हॉकी संघाने रविवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या राऊंड – रॉबिन सामन्यात मलेशियाचा ५-० असा पराभव केला. भारताकडून कार्ती सेल्वम, हार्दिक सिंग, कर्णधार हरमनप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि जुगराज सिंग यांनी गोल केले. या विजयानंतर भारत गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला असून उपांत्य फेरीचा मार्गही मोकळा झाला आहे. भारताने पहिल्या क्वार्टरची सुरुवात अतिशय आक्रमकपणे केली आणि अनेक चांगल्या संधी निर्माण केल्या.

पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने मलेशियन बॉक्समध्ये चेंडू घेऊन तो सेल्वमकडे पास केला आणि त्याने सहज गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीयांनी आक्रमणे सुरूच ठेवली आणि दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्याचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही.

तिसऱ्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला हरमनप्रीतने मूळ शॉट चुकवल्यानंतर पेनल्टी कॉर्नरवरून हार्दिकने रिबाउंड शॉटने गोल केला. या क्वार्टरमध्ये मलेशियालाही पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि नजमी जझलाननेही गोल केला, पण त्यासंदर्भात भारत व्हिडिओ रेफरलसाठी गेला. धोकादायक फ्लिकसाठी हा गोल नाकारण्यात आला.

भारताला ४२ व्या मिनिटाला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. भारताचा चौथा गोल गुरजंतने ५३व्या मिनिटाला केला, त्याचा पाया हार्दिक आणि मनदीप सिंगने रचला. जुगराजने पुढच्याच मिनिटाला आणखी एक गोल करून भारताची आघाडी पाच गोलने वाढवली. भारताचा पुढील सामना आता सोमवारी गतविजेत्या दक्षिण कोरियाशी, तर मलेशियाचा सामना जपानशी होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा