भारत बनला विश्वविजेता, बानाने धोनीप्रमाणे ठोकला षटकार, जिंकला U19 WC, 5व्यांदा जिंकली ट्रॉफी

Under 19 World Cup 2022 भारतीय क्रिकेटच्या युवा ब्रिगेडने इतिहास रचलाय. टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेलेला अंडर-19 विश्वचषक जिंकला आणि विक्रमी पाचव्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला.

अंतिम सामन्यात इंग्लंडने 189 धावा केल्या होत्या आणि भारताला 190 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने 47.4 षटकात 6 गडी गमावून 195 धावा केल्या.

सामना शेवटच्या फेरीत पोहोचला तेव्हा टीम इंडियाच्या फलंदाजांनी धावांचा वेग वाढवला. टीम इंडियाच्या दिनेश बानाने षटकार ठोकत भारताला विश्वविजेते बनवलं. 2011 साली महेंद्रसिंग धोनीने 50 षटकांच्या विश्वचषकात भारताला षटकार ठोकून विजेतेपद मिळवून दिलं होतं.

कर्णधार यश धुळच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद करत अंतिम फेरीत इंग्लंड संघाचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने त्यांना अवघ्या 189 धावांत ऑलआउट केलं. नंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी आपलं हे लक्ष्य गाठलं.

टीम इंडियाच्या फलंदाजांनी केली अप्रतिम कामगिरी

भारताला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य मिळालं होतं, अशा परिस्थितीत टीम इंडियाने अत्यंत सावधपणे सुरुवात केली. टीम इंडियाची पहिली विकेट दुसऱ्या चेंडूवरच पडली, मात्र त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीद यांनी भागीदारी केली. यानंतर टीम इंडियाला 95, 97 च्या स्कोअरवर सलग दोन धक्के बसले.

पण शेवटी निशांत सिद्धू, राज बावा आणि नंतर दिनेश बाना यांच्या शानदार कॅमिओच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली. दिनेश बानाने षटकार ठोकून भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिलं.

भारताने इंग्लंडला कमी धावांवर बाद केलं

इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरला नाही. टीम इंडियाने सुरुवातीपासूनच इंग्लंडवर दबाव कायम ठेवला. राज बावा आणि रवी कुमार यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला धक्के दिले आणि 50 धावांतच इंग्लंडचा निम्मा संघ बाद झाला.

इंग्लंडसाठी फक्त जेम्स रीयूला एक आघाडी सांभाळता आली आणि त्याने 95 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने मोठी धावसंख्या काढली नाही. टीम इंडियाकडून राज बावाने 5, तर रवी कुमारने 4 विकेट्स घेतल्या. केवळ शानदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला 181 धावांवर रोखलं होतं.

◾Under 19 World Cup 2022 मध्ये भारताचे फलंदाज

• अंगकृष्ण रघुवंशी – 6 सामने, 278 धावा, 46.33 सरासरी
• यश धुल – 4 सामने, 229 धावा, 76.33 सरासरी

◾ अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये भारताचे गोलंदाज

• विकी ओस्तवाल – 6 सामने, 12 विकेट
• रवी कुमार – 6 सामने, 10 विकेट्स

◾ 2022 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा प्रवास

• दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव
• आयर्लंडचा 174 धावांनी पराभव
• युगांडाचा 326 धावांनी पराभव
• बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला (उपांत्यपूर्व फेरी)
• ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला (उपांत्य फेरी)
• इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला (अंतिम)

◾केव्हा केव्हा जिंकला भारताने अंडर-19 विश्वचषक?

• वर्ष 2000 – भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला, कर्णधार- मोहम्मद कैफ
• वर्ष 2008 – भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, कर्णधार- विराट कोहली
• वर्ष 2012 – भारताने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, कर्णधार- उन्मुक्त चंद
• वर्ष 2018 – भारताने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, कर्णधार- पृथ्वी शॉ
• वर्ष 2022 – भारताने अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव केला, कर्णधार- यश धुल

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा