भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका संघाकडून दारुण पराभव, मिलर आणि ड्युसेनची धमाकेदार खेळी

Ind Vs Sa 1st T20 Match, 10 जून 2022: नवी दिल्ली येथे गुरुवारी (9 जून) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नवा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 211 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने झटपट फलंदाजी करत अखेरच्या षटकात हे लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलर, रॉसी ड्युसेन यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक भागीदारी करत आफ्रिकन संघाला 7 विकेटने विजय मिळवून दिला.

मिलर आणि ड्युसेनच्या झंझावाताने भारतीय गोलंदाजांची उडाली तारांबळ

टीम इंडियाने आफ्रिकन टीमला 212 रन्सचं टार्गेट दिलं होतं, आफ्रिकन टीमनं 81 रन्सवर तीन विकेट गमावल्या होत्या, तेव्हा टीम इंडिया हा मॅच सहज जिंकेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही, डेव्हिड मिलर आणि रॉसी ड्युसेन यांनी 131 धावांची विक्रमी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

डेव्हिड मिलरने येथे 31 चेंडूत 64 धावा केल्या, त्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 5 षटकार खेचले. डेव्हिड मिलरने केवळ 22 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्त दुसरं सर्वात जलद अर्धशतक आहे.

आफ्रिकन संघाने हे लक्ष्य कोणत्या झंझावाती पद्धतीने गाठलं, याचा अंदाज या संघाने एकूण 14 षटकारांच्या जोरावर लावला. सर्व फलंदाजांनी मिळून 17 चौकारही ठोकले.

फलंदाजीत उत्तम तर गोलंदाजीत निराशा

टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर सलामीवीर इशान किशनने 76 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण नंतर कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्याने दमदार खेळ दाखवला. दोघांमध्ये तुफानी भागीदारी झाली, पंतने 29 आणि हार्दिकने 31 धावा केल्या.

टीम इंडियाने बॅटिंगमध्ये जितका चांगला खेळ केला, तितकाच खराब खेळ बॉलिंग मध्ये झाला. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या 4 षटकात 43 धावा दिल्या, तर हर्षल, अक्षर आणि युजवेंद्र चहल यांनी देखील 10 पेक्षा जास्त इकॉनॉमीसह धावा दिल्या.

सलग 12 विजयानंतर पराभूत

या विजयासह टीम इंडियाला विश्वविक्रम करण्याची संधी होती. पण हे होऊ शकलं नाही. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने सलग 12 टी-20 सामने जिंकले होते, जर येथे जिंकले असते तर 13 विजय मिळवणारा पहिला संघ बनला असता. मात्र आफ्रिकन संघाने ही योजना उधळून लावली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा