सुपर-४ फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव

पुणे, ५ सप्टेंबर २०२२: यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमधील भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी संघर्ष पाहायला मिळाला. दुबई येथे झालेल्या सुपर फोरमधील या थरारक सामन्यात पाकिस्तानने एका आठवड्यात आपल्या पराभवाचा बदला घेत भारतीय संघाला पराभूत करत अंतिम फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले.

भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ या जोडीने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पाकिस्तानला विजयापर्यंत पोहोचता आले. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुकांमुळेदेखील भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. अर्शदीप सिंगने सोडलेला झेल भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण बनला.

दोन्ही संघ सुपर फोर फेरीतील आपला हा पहिला सामना खेळत होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी वेगवान फलंदाजी करताना पावर प्लेमध्येच ५४ धावा काढल्या.‌ दोघेही प्रत्येकी २८ धावा काढून माघारी परतले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव १३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला. भारताकडून एकटा विराट कोहली अर्धशतकी खेळी करू शकला. त्याने सर्वाधिक ६० धावा केल्या. निर्धारित २० षटकात भारतीय संघ ७ बाद १८१ धावा करू शकला.

भारताच्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. बाबरला यावेळी १४ धावांवर समाधान मानावे लागले. बाबर बाद झाला असला तरी रिझवान मात्र खेळपट्टीवर ठाम मांडून उभा होता.  दुसऱ्या विकेटसाठी आलेला फखर जमानही चांगली कामगिरी करू शकला नाही. १५ धावांवर खेळत असताना त्याला युझवेंद्र चहलने झेलबाद केले. त्यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाझ या जोडीने चोख भूमिका बजावली. रिझवानने ५१ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकार लगावत ७१ धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने २० चेंडूंमध्ये दोन चौकार, दोन षटकार लगावत ४२ धावा केल्या. तर खुशदील शाह (१४), असिफ अली (१६) या जोडीने संघाला विजयापर्यंत नेलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा