नाशिक, ३१ ऑगस्ट २०२०: बुद्धिबळ क्षेत्रातील महत्त्वाच्या ‘फिडे जागतिक ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने ९६ वर्षच्या इतिहासामध्ये मध्ये पहिल्यांदाच बाजी मारली आहे. स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्वर मध्ये बिघाड निर्माण झाल्यानंतर भारत आणि रशिया या दोघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. यापूर्वी रशियाला विजेतेपद देण्यात आलं होतं. यावर भारताने आक्षेप घेतला होता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघाने दोघांनाही संयुक्त विजेता घोषित केले.
या ९६ वर्षाच्या इतिहासामध्ये भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकाविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या संघाचं कौतुक केलं आहे. ट्विट करत पंतप्रधानांनी या संघाचं अभिनंदन केलं आहे. नाशिकचा विदित गुजराती हा या संघाचा कर्णधार होता.
या विजयानंतर कर्णधार विदित म्हणाला की, “भारतीय संघाला या स्पर्धेत विजय मिळाला ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. सलग नऊ दिवस आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यांना यश आलं आहे. आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये भारताला गोल्ड मेडल याआधी कधीच मिळालं नव्हतं ते यावेळी मिळालं ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हा सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. याचं क्रेडिट कोणालाही एकला देता येणार नाही कारण सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी