लखनऊ , ३० जानेवारी २०२३ : पहिल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरले गेले आहे. भारतीय महिला संघाने इंग्लंडचे सात गडी राखून शेफाली वर्माच्या नेतृत्वात उत्तम कामगिरी करीत इतिहास घडवला आहे. चाहत्यांप्रमाणेच पुरुष संघातील खेळाडूंनी महिला संघाचे अभिनंदन केले आहे. तर गोलंदाजीत पुढे जात इंग्लंडला केवळ ६८ धावांवर रोखून ठेवणाऱ्या आणि फलंदाजीने सहा षटके शिल्लक असताना लक्ष गाठणाऱ्या खेळाडूंचे विशेष कौतुक केले जात आहे. भारतीय महिला संघाच्या या विजयाबद्दल देशाच्या राष्ट्रपतींपासून चाहत्यांपर्यंत प्रत्येकानेच अभिमान व्यक्त केला आहे.
भारतीय संघाने १७.१ षटकांमध्ये इंग्लंडला केवळ ६८ धावांमध्ये गुंडाळून घेतले. त्यानंतर अपेक्षित असलेल्या धावा करण्यासाठी तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १४ षटकांत ६९ धावा पार करीत भारतीय मुलींनी स्वतःची एक वेगळी छाप क्रिकेट विश्वात निर्माण केली. ‘भारतीय १९ वर्षांखालील महिला संघासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून, मैदानावर त्यांचा दिवस चांगला गेला’ असे म्हणत भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी महिला संघाचे कौतुक केले.
महिला संघाच्या यशानंतर रविवारी लखनौमध्ये झालेल्या टी- ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या संघर्ष पूर्ण विजयानंतर भारतीय संघाने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये राहुल द्रविडसह पृथ्वी शॉ याने देखील महिला भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पृथ्वीने १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वकरंडक विजेत्या संघाचे नेतृत्व केल्याने महिला संघाचा विजयाचा आनंदही त्याच्या चेहऱ्यावरही दिसून आला. भारतात पहिला टी- ट्वेंटी विश्वकरंडक महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला गेला होता आणि आज १९ वर्षांखालील मुलींनी शेफाली वर्माचा नेतृत्वाखाली तसाच पराक्रम करून दाखवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे.