“From Bull’s Eye to Gold – Para Shooter Millie Shah Shines as Golden Girl at National Championship!”
गुजरातची पॅरा शूटर मिली शहा हिने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत सर्वांना थक्क केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या आर३ मिक्स १० मीटर एअर रायफल प्रोन एसएच१ प्रकारातील स्पर्धेत २४९.७ गुण मिळवत तिने सुवर्णपदक जिंकले. हे तिचे पहिले राष्ट्रीय सुवर्ण असून, त्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
मिली सांगते – “फायनलमध्ये शेवटच्या शॉटपर्यंत मनावर ताबा ठेवायचा असा निर्धार केला होता. चुकलेल्या शॉटचा परिणाम मनावर होऊ दिला नाही, आणि याच मानसिक ताकदीमुळे मी सुवर्ण जिंकले.”
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये ऑलिम्पिक विजेती अवनी लेखरा आणि अनुभवी खेळाडू होते. पण हेच दिग्गज स्पर्धक तिच्या जवळ येऊन तिला धीर देत होते. त्या क्षणाला आठवत मिली म्हणते – “ते सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले, मार्गदर्शन केले आणि दडपण नाहिसे झाले. सुवर्ण मिळाल्यावर तेच लोक मला शुभेच्छा देण्यासाठी धावत आले.”
मिलीचे प्रवास खूप प्रेरणादायी आहे. सुरुवातीला खेळात रस नसलेल्या मिलीनं मजेत शूटिंग करून पाहिलं आणि पहिला शॉट थेट बुल्स आय लागला! त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. दिल्लीतील पहिल्या झोनल स्पर्धेतून ते आजपर्यंत तिचा प्रवास संघर्ष, मेहनत आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे.
तिची आई शीतल शहा भावूक होऊन म्हणतात – “मिली माझ्यासाठी तळहाताच्या फोडासारखी आहे. तिला नेहमी जपते, तिच्या अडचणींमध्ये साथ देते. देवानेच तिला देशासाठी पदके जिंकण्यासाठी पाठवले आहे.”
आज डॉक्टरेट करत असलेली ही पॅरा शूटर कला, संगीत, अभ्यास आणि खेळ यांचा सुंदर संगम आहे. “शूटिंग माझ्या श्वासाचा भाग झालं आहे. अजून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी नावलौकिक करायचा आहे,” अशी जिद्द मिली व्यक्त करते.
पुणे प्रतिनिधि शिवाजी गोरे












































