भारताने एन-९५ प्रकारचे १० लाख ८० हजार मास्क येथे पाठवले

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर २०२० : भारत अमेरिका यांच्यातील आरोग्य क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करत भारतानं काल कोविड १९ विरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचं हत्यार म्हणता येतील असे एन-९५ प्रकारचे १० लाख ८० हजार मास्क पेनसिल्वेनिया राज्यात फिलाडेल्फिया इथं पाठवले.

फिलाडेल्फियाचे महापौर जिम केनी यांनी भारताला याविषयी विनंती केली होती. त्यानुसार हे मास्क पाठविण्यात आले आहेत. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी काल ट्वीटरद्वारे ही माहिती दिली. फिलाडेल्फिया हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकवस्तीच्या शहरांपैकी एक असून तिथं कोविड १९ प्रतीबंधासाठी झटणाऱ्या आघाडीच्या कोविड योद्ध्यांना मास्कचा तुटवडा भासत असल्यानं महापौरांनी ५ ऑक्टोबरला भारताला मास्क पुरविण्याबाबत विनंती केली होती.

त्यानुसार अवघ्या ४ दिवसात भारतानं हे मास्क पुरविले असून त्यामुळे भारताची वाढती उत्पादनक्षमता आणि निर्यातक्षमता अधोरेखित होते, असं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. यापूर्वीही भारतानं अमेरिकेला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा