चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून खरेदी करणार ‘प्रिडेटर ड्रोन’

नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२२ : आज देशभरात भारतीय नौदल दिन साजरा केला जात आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि ‘ऑपरेशन ट्रायडेंट’ मधील त्यांच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. या युद्धानंतर देशाच्या तिन्ही सैन्यांचे झपाट्याने आधुनिकीकरण झाले आहे. त्यानंतर सैन्याला नवीन शस्त्रे पुरवली जात आहेत. या अंतर्गत आता या एपिसोडमध्ये MQ-9B प्रीडेटर ड्रोन जोडले जाणार आहे.

याबाबत माहिती देताना नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले की, चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून प्रीडेटर ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. भारत ३ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून ३० MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. यामुळे भारताची पाळत ठेवण्याची क्षमता वाढेल. हे ड्रोन भारतीय लष्करासाठी देखील खास असेल. कारण ते उंचावर असलेल्या भागात देखील तैनात केले जाऊ शकते.

MQ-9B हे जगातील सर्वात प्रगत ड्रोन म्हणून ओळखले जाणारे प्रीडेटर ड्रोन आहे. MQ-9B प्रीडेटर ड्रोन भारताला मिळाल्यानंतर शेजारील देशांची झोप उडणार आहे. ड्रॅगन असो की पाकिस्तान, सगळ्यांच्या नजरा भारत-अमेरिकेतील या डीलकडे लागल्या आहेत. या ड्रोनचा वापर प्रामुख्याने चीन सीमा आणि हिंदी महासागर क्षेत्रात केला जाणार आहे. दरम्यान, या ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीवर हेलफायर मिसाइलने हल्ला करून त्याला ठार केले होते.

चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यात सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर नौदलाने २०२० मध्ये जनरल अॅटॉमिक्सकडून दोन हाय अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स (HALE) ड्रोन – MQ-9B सी गार्डियन ड्रोन भाड्याने घेतले आहेत. हिंदी महासागरावर लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा