भारत बनणार 2G मुक्त 5G युक्त, रिलायन्सने लॉन्च केला गुगलच्या सहकार्याने ‘जिओफोन नेक्स्ट’

नवी दिल्ली, २५ जून २०२१: रिलायन्स जिओ आणि गूगलच्या भागीदारीत बनविलेला एक नवीन स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट गुरुवारी लाँच झालाय. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी JioPhone Next लॉन्च केला. नवीन स्मार्टफोनमध्ये जिओ आणि गूगलची वैशिष्ट्ये आणि अ‍ॅप्स असतील. या अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गूगल यांनी संयुक्तपणे तयार केलीय. अंबानी यांनी जाहीर केलं की नवीन स्मार्टफोन सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा बनविला गेलाय. त्याची विक्री १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून सुरू होईल. अंबानी म्हणाले की, देशाला 2G मुक्त 5G युक्त बनविणं हे आमचं लक्ष्य आहे.

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन

भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्टवर गूगल प्ले स्टोअरवरून वापरकर्ते ॲप्स डाऊनलोड करू शकतात. या स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे वैशिष्ट्यीकृत स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केलं. मात्र, अद्याप त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

तज्ञांचा असा दावा आहे की, त्याची किंमत अतिशय कमी ठेवली जाईल. जिओ-गूगलचा अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोन जिओफोन पुढील गेम चेंजर असल्याचं सिद्ध करेल. हा स्मार्टफोन ३० कोटी लोकांचं जीवन बदलू शकतो ज्यांच्या हातात अद्याप 2G मोबाइल सेट आहेत. जिओ-गुगलचा नवीन स्मार्टफोन फास्ट, चांगली ऑपरेटिंग सिस्टम आणि परवडणार्‍या किंमतीच्या आधारे कोट्यावधी ग्राहकांना रिलायन्स जिओशी कनेक्ट करू शकेल.

वापरकर्त्यांसाठी नवीन पर्याय उघडतील

गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी नवीन स्मार्टफोनबद्दल सांगितलं होतं की, आमची पुढील पायरी गुगल आणि जिओच्या सहकार्यानं बनविण्यात आलेल्या नवीन परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होईल. हा स्मार्टफोन खासकरून भारतासाठी बनवला गेलाय ज्यामुळं करोडो लोक इंटरनेटच्या जगाशी जोडले जातील. गूगल क्लाऊड आणि जिओ यांच्यात नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि भारताच्या पुढच्या टप्प्यातील डिजिटायझेशनची पायाभरणी करण्यास मदत करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा