Asia Cup 2022, 20 मार्च 2022: आशिया कप 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे (Ind Vs Pak). यावेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल आणि त्यासाठीचे पात्रता सामने 20 ऑगस्ट 2022 पासून खेळवले जातील.
टीम इंडिया आशिया कप इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आल्यापासून भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे.
दुसरीकडे श्रीलंका पाच विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. आशिया कपच्या इतिहासात श्रीलंकेने 14 वेळा सहभाग घेतला आहे. त्यापाठोपाठ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांनी ही स्पर्धा १३ वेळा खेळली आहे.
सहा संघ होणार सहभागी
आशिया कप 2022 मध्ये सहा संघ असतील, ज्यात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि एक पात्रता संघाचा समावेश आहे. क्वालिफायर सामना यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे.
आशिया चषक क्रिकेट दर दोन वर्षांनी केले जात असले तरी, कोविड-19 महामारीमुळे आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) 2020 ची आवृत्ती रद्द केली होती. जून 2021 मध्ये श्रीलंकेत होणारी ही स्पर्धा ACC ला आयोजित करायची होती, पण साथीच्या रोगाने आयोजकांच्या योजना बिघडल्या.
जय शहा यांचा कार्यकाळ वाढला
दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचा कार्यकाळ एक वर्षाने एकमताने वाढवण्यात आला आहे. ओमान क्रिकेट बोर्डाचे पंकज खिमजी यांची एसीसीच्या उपाध्यक्षपदी आणि मलेशिया क्रिकेट असोसिएशनचे महिंदा वल्लीपुरम यांची विकास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोलंबो येथे शनिवारी झालेल्या एसीसीच्या एजीएममध्ये हा निर्णय घेण्यात आला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे