Divya Deshmukh defeats world number one in chess: नागपूरची कन्या आणि आंतरराष्ट्रीय वुमन ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने लंडन येथे पार पडलेल्या वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2025 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या हाऊ यिफान हिला पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सामन्याची थरारक लढत;
दिव्या आणि हाऊ यिफान यांच्यातील हा सामना 74 चालींपर्यंत चालला. सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी समान ताकदीने खेळ दाखवला, पण सामन्याच्या अंतिम टप्प्यात हाऊ यिफानकडून झालेली छोटीशी चूक दिव्याने अचूक साधली आणि सामना जिंकत इतिहास रचला. या विजयाने तिने केवळ आपली कौशल्यपूर्ण खेळी दाखवली नाही, तर नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा दिली आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
दिव्याच्या या अभूतपूर्व यशाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, “दिव्या देशमुखचे अभिनंदन! तिचे यश तिच्या संयम आणि दृढनिश्चयाचे प्रतिबिंब आहे. हा विजय अनेक नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल.” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिव्याचे अभिनंदन करत तिच्या यशाचा नागपूरकरांना अभिमान असल्याचे सांगितले.
नागपूरकरांसाठी अभिमानाचा क्षण;
नागपूरच्या या सुपुत्रीने यापूर्वीही जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले होते, ज्यामुळे तिची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली. या नव्या यशाने ती भारताची ‘चेस क्वीन’ म्हणून उदयास आली आहे. सोशल मीडियावरही तिच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दिव्याच्या या विजयाने तिची जागतिक बुद्धिबळातील उज्ज्वल भविष्याची खात्री पटवली आहे. तिच्या या कामगिरीने नागपूरसह संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. भविष्यातही ती अशीच चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्वांना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; प्रज्ञा शिंदे










































