सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे थरमन षण्मुगरत्नम यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली

सिंगापूर, २ सप्टेंबर २०२३ : सिंगापूरमध्ये जन्मलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थरमन षणमुगरत्नम यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. २०११ नंतर प्रथमच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या दोन प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. २०११ ते २०१९ या काळात सिंगापूरचे उपपंतप्रधान राहिलेल्या षणमुगरत्नम (६६) यांना ७०.४ टक्के मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी एन.कोक सोंग आणि टॅन किन लियान यांना अनुक्रमे १५.७ टक्के आणि १३.८ टक्के मते मिळाली.

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. पंतप्रधान ली.सिएन लूंग यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल षणमुगरत्नम यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, सिंगापूरच्या लोकांनी थर्मन षण्मुगररत्नम यांना निर्णायक फरकाने आमचे पुढचे अध्यक्ष म्हणून निवडले आहे. राज्याचे प्रमुख म्हणून ते देश-विदेशात आमचे प्रतिनिधित्व करतील.

राष्ट्राध्यक्ष हलीमाह याकूब यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्या देशाच्या आठव्या राष्ट्रपती आणि हे पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सिंगापूरमधील २०१७ च्या अध्यक्षीय निवडणूक ही एक राखीव निवडणूक होती, ज्यामध्ये फक्त मलय समुदायाच्या सदस्यांनाच लढण्याची परवानगी होती. त्यादरम्यान हलीमाह याकूब यांना अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करण्यात आले कारण दुसरा उमेदवार नव्हता. सिंगापूरमध्ये २०११ नंतरची ही पहिलीच अध्यक्षीय निवडणूक होती.

देशाची संस्कृती जगामध्ये चमकत ठेवण्याची प्रतिज्ञा घेऊन षणमुगरत्नम यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या अध्यक्षीय प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. २००१ मध्ये राजकारणात प्रवेश केलेल्या षणमुगररत्नम यांनी दोन दशकांहून अधिक काळ सत्ताधारी पीपल्स ऍक्शन पार्टी (PAP) सोबत सार्वजनिक क्षेत्रातील आणि मंत्रीपदे भूषवली आहेत. सिंगापूरमध्ये २८ ऑगस्ट १९९३ रोजी पहिली राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा