नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३ :भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने टेनिस कोर्टवर अनेक विक्रम केले आणि ग्रँड स्लॅम विजेतेपदही पटकावले. नुकतेच सानियाने या खेळाला अलविदा केला. आता ती क्रिकेटच्या मैदानावर एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. बीसीसीआय प्रथमच महिला प्रीमियर लीगचे (WPL) आयोजन करत आहे. ४ मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने महिला संघासाठी सानिया मिर्झाची मेंटाॅर म्हणून नियुक्ती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानिया तिच्या या नव्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. महिला लीगमध्ये एकूण ५ संघ सहभागी होत आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात एकूण ८७ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यामध्ये ३० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. आरसीबीने स्मृती मंधानाला ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. तसेच ती या लीगमधील सर्वात महागडी खेळाडू आहे.
आरसीबीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सानिया मिर्झाशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सानिया मिर्झाने सांगितले की, ती तिच्या नवीन भूमिकेबद्दल खूप उत्साहित आणि रोमांचित आहे. ती म्हणाली की, मी जवळपास २० वर्षे व्यावसायिक टेनिसशी संलग्न आहे. आता निवृत्तीनंतरही मला खेळात योगदान द्यायचे आहे. खेळ कोणताही असो, दडपण तेच असते.
पुढे सानिया म्हणाली की, कोणत्याही खेळात संघ बांधणी आणि संघ भावना आवश्यक असते. मला आरसीबीच्या खेळाडूंसोबत अशीच सुरुवात करायची आहे. गेल्या २० वर्षात मी जे काही शिकले ते मला इतर खेळाडूंसोबत शेअर करायला नक्कीच आवडेल, असेही तिने म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.