भारताचं आशिया चषक स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, रोमहर्षक लढतीत श्रीलंकेचा सहा विकेट्सनं विजय

पुणे, ७ सप्टेंबर २०२२ : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर टीम इंडियाचा पराभव झालाय. आशिया चषक २०२२ च्या सुपर फोरमधील तिसरा. सामना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पार पडला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत भारतीय संघाला ६ गडी राखून पराभूत करत अंतिम फेरीतील आपली जागा जवळपास पक्की केली.

नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारतीय संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. मात्र, केएल राहुल व विराट कोहली यांना झटपट बाद करत श्रीलंकेने शानदार खेळी केली. तिसऱ्या गड्यासाठी कर्णधार रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी ९७ धावा करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. रोहितने ७१ तर सूर्यकुमार यादवने ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्या व रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर, रविचंद्रन अश्विनने महत्त्वपूर्ण १५ धावांचे योगदान देत संघाला ८ बाद १७३ पर्यंत मजल मारून दिली. श्रीलंकेसाठी मधुशंका याने तीन बळी मिळवले.

भारताने दिलेल्या १७४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या पथुम निसांका (५२) आणि कुशल मेंडिस (५७) यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतकी खेळी केल्यामुळे ११ षटकापर्यंत श्रीलंका संघ अतिशय चांगल्या स्थितीत होता. मात्र अवघ्या ९७ पासून ११० धावावर येईपर्यंत श्रीलंकेचे तब्बल चार गडी बाद झाले. चरित असलंका (०), दानुष्का गुनाथिलका (१) खास कमाल दाखवू शकले नाहीत. भानुका राजपक्षे आणि दासून शनाका शेवटपर्यंत नाबाद राहिले. शेवटच्या ५ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना या दोघांनी कुशलतेने फलंदाजी केली. राजपक्षेने (नाबाद) २५ तर दासून (नाबाद) ३३ धावा केल्या.

भारतानं दिलेलं १७४धावांच आव्हान श्रीलंकेनं चार गड्यांच्या मोबदल्यात एक चेंडू राखून पार केलं. आशिया चषकातील सुपर ४ लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.  

भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार की नाही, हे आता आजच्या होणाऱ्या सामन्यावर अवलंबून असेल. कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता आज होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने जर पाकिस्तानला पराभूत केले तर भारताला फायनलमध्ये पोहोचण्याचा दरवाजा चांस वाढू शकतो. कारण पाकिस्तानचा हा सुपर-४मधील पहिला पराभव असेल. स्पष्ट सांगायचे तर पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले आणि भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय साकारला तरच भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो, अन्यथा भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा