हेडिंग्ले, २६ ऑगस्ट २०२१: लॉर्ड्स कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर हेडिंग्ले मैदानावर भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरला. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण केले. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या ७८ धावांवर तंबूत परतले.
तिसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी, पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. रोहित शर्मा (१९) आणि अजिंक्य रहाणे (१८) सोडले, तर एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज हसीब हमीद आणि रोरी बर्न्स यांनी शतकी भागीदारी रचली आहे. या दोघांनी ३२व्या षटकात भारताच्या ७८ धावांचा आकडा पार केला. त्यानंतर दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ४२ षटकात बिनबाद १२० धावा केल्या असून त्यांच्याकडे आता ४२ धावांची आघाडी आहे. बर्न्स ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५२ आणि हमीद ११ चौकारांसह नाबाद ६० धावांवर नाबाद आहे.
भारताचा पहिला डाव
गेल्या कसोटी सामन्यात एकहाती संघाची कमान सांभळणारा सलामीवीर के एल राहुल हा आज पहिल्याच षटकाच्या पाचव्या बोलवर बाद झाला. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याने पहिल्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुन्हा पाचव्या षटकात जेम्स अँडरसन याने दुसरा बळी घेतला. यावेळी त्याने चेतेश्वर पुजाराला झेलबाद केलं. जोस बटलरने त्याचा झेल टिपला. त्यावेळी भारतीय संघ अवघ्या चार धावांवर होता. पुजारा नंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जेम्स अँडरसन आणि जोस बटलर या दोघांनी मिळून कोहलीला झेलबाद केलं. जेम्स अँडरसन याच्या बोलवर बटलरने त्याचा झेल टिपला.
विराट कोहलीनंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेकडे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. रोहित आणि अजिंक्य मोठी भागीदारी करुन आपल्या खेळीचं अद्भूत दर्शन घडवून देतील, अशी आशा लागली होती. पण इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन याने आशांवर पाणी फेरलं. त्याने अजिंक्य राहणेला झेलबाद केला. यावेळी देखील जोस बटलर यानेच त्याचा झेल टिपला. त्यानंतर भारतीय संघाला जणू काही उतरती कळाच लागली. ऋषभ पंत २ धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवर रोहित शर्माही झेलबाद झाला. त्यापाठोपाठ काही धावांच्या अंतरावर एकामागेएक मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या ७८ धावांवर बाद झाला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे