नवी दिल्ली, दि. १५ जुलै २०२०: नुकताच इराणने भारताला मोठा झटका दिला आहे. चाबहार पोर्ट ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर काढले आहे. या प्रकल्पासाठी भारताकडून येणारा निधी तसेच होणाऱ्या कामाला विलंब होत असल्याने इराणने हा प्रकल्प स्वतःच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर श्रीलंके मधून देखील भारताला हवाई अड्डा प्रकल्पातून बाहेर पडावे लागणार आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक धोरणामध्ये व राजकारणामध्ये भारताला सर्वत्रच मात मिळत आहे त्यामुळे भारताच्या जागतिक धोरणांची लक्तरे निघत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. आपल्या ट्विटर हँडल वरून राहुल गांधी यांनी अशी टीका केली आहे. यावेळी ते असेही म्हणाले की, भारत आपला सन्मान व ताकद गमावत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे निघत आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचं याची काहीच कल्पना नाही”.
काय आहे हे प्रकरण?
चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. द हिंदू मध्ये आलेल्या एका बातमीनुसार इरणाने असे सांगितले आहे की, भारताकडून या प्रकल्पासाठी येणारा निधी व या प्रकल्पाचे कामकाज या दोन्ही बाबींमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे आता इराण सरकारने स्वतः हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत हा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार होता. या प्रकल्पाला आता जवळपास चार वर्षे होत आली आहेत परंतु अद्याप भारताकडून या प्रकल्पावर ठोस कार्य केले गेले नसल्याचे इराणने म्हटले आहे.
हा संपूर्ण प्रकल्प मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. इराण रेल्वे विभाग भारताच्या कोणत्याही मदतीविना हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी राष्ट्रीय विकास निधीची वापर करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
यामध्ये चिंताजनक बाब अशी आहे की चीन कडून इराण मध्ये ४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची बातमी समोर आली आहे. भारताचे संबंध इराण सोबत हळू हळू खराब होत चाललेत की काय असा प्रश्न आता उभा राहिला आहे. कारण इराणमध्ये देखील आता चीन आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने पुढील २५ वर्षांसाठी इराणसोबत करार केला आहे. इराण रेल्वे आणि इंडियन रेल्वेज कन्स्ट्रक्शन लिमिटेड (IRCON) यांच्यात या रेल्वे प्रकल्पावरुन चर्चा सुरु होती. हा प्रकल्प भारताच्या अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यासाठी असणाऱ्या कटिबद्धतेचा तसंच इराण आणि अफगाणिस्तानसोबत असणाऱ्या त्रिपक्षीय कराराचा भाग होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी