डब्ल्यूटीसी अंतिममध्ये पोचण्यासाठी भारताला शेवटची संधी; अन्यथा भारताच्या अडचणी वाढणार

36

पुणे, ५ मार्च २०२३ : ऑस्ट्रेलियाने इंदूर येथील तिसरा कसोटी सामना जिंकून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकत अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाचा पराभवामुळे मार्ग कठीण झाला आहे. या स्थितीत भारताला चौथी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. बरोबरी किंवा पराभव झाल्यास न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल.

यंदाची बॉर्डर-गावसकर स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारतीय संघ व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या सल्ल्याने भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांना आयपीएल स्पर्धा आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ध्यानात ठेवत ब्रेक देण्याचे ठरविले आहे. या योजनेनुसार शमीला तिसऱ्या, तर सिराजला चौथ्या सामन्यात विश्रांती देण्यात येईल, असे ही मालिका सुरू होण्याआगोदरच ठरले होते. शमी आणि सिराज या दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकरिता भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांनाही एकदिवसीय मालिकेआधी थोडी विश्रांती मिळणार आहे.

अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ही फिरकीला जास्त अनुकूल न राहता ती जलदगती गोलंदाजालाही साह्य करणारी असू शकते, त्याकरिता रिव्हर्स स्विंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले जाऊ शकते; तर पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत खेळलेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीने यंदाच्या बॉर्डर-गावसकर करंडकामध्ये दोन लढतींमध्ये १४.४३ च्या सरासरीने ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद केले आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र होण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.

ऑस्ट्रेलियन संघाने ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये तिसरा सामना जिंकून पुनरागमन केले आहे. इथून ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरीही करू शकतो; तसेच भारताला मालिका २-१ किंवा ३-१ अशी जिंकण्याची संधी असेल. जर भारतीय संघाने अहमदाबादमध्ये खेळली जाणारी चौथी कसोटी जिंकली तर मालिकेची स्कोअर लाइन ३-१ असेल आणि अनिर्णित राहिल्यास स्कोअर लाइन २-१ अशी असेल.

डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाल्यास, २०२१-२३ सायकलमध्ये, ऑस्ट्रेलियाच्या संघाची तिसऱ्या सामन्यांनंतर विजयाची टक्केवारी ६८.५२ टक्के आहे. त्याचबरोबर भारताची विजयाची टक्केवारी पराभवानंतर ६०.२९ टक्क्यांवर आली आहे. श्रीलंकेचा संघ तिसर्‍या क्रमांकावर नक्कीच आहे; पण यावेळी त्यांची विजयाची टक्केवारी ५३.३३ टक्के आहे, तर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ५२.३८ टक्के आहे.

भारताच्या अडचणी वाढणार?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघ पुढचा सामना हरला तर समीकरण अधिकच गुंतागुंतीचे होईल. कारण त्यानंतर त्यांच्या हातात काहीच राहणार नाही. कारण भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. ज्यामध्ये भारताला प्रार्थना करावी लागेल की, न्यूझीलंडचा संघाने श्रीलंकेला दोन्ही सामन्यांत पराभूत करावे किंवा किमान मालिका १-० ने जिंकावी.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा