क्षेत्रीय मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारताचे ‘मिशन सागर’

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: संपूर्ण जगभरामध्ये कोविड-१९ महामारीचा उद्रेक झाला आहे, या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांसाठीही अनेक उपाय योजना केल्या आहेत आणि मदतीचा हात दिला आहे.  त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी मदत सामुग्री घेवून काल रवाना झाले. मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी ‘केसरी’ जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-१९ महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या एचसीक्यू औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक आज पाठवण्यात आले.

कोविड-१९ महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांशी सामना करण्यासाठी भारताच्या या मित्र देशांपुढे अनेक समस्या आहेत; हे जाणून, त्याचबरोबर या देशांशी असलेले दृढ ऋणानुबंध लक्षात घेवून भारताने ‘मिशन सागर’ सुरू केले आणि मदत सामुग्री पाठवली आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी मोहीम सुरू करून या देशांना असा मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला देश आहे.

आपल्याबरोबरच क्षेत्रीय शेजारी राष्ट्रांचा विकास होणे आवश्यक आहे, असा दृष्टीकोन पंतप्रधानांचा आहे. म्हणून ‘सेक्यूरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ म्हणजेच- ‘सागर’ असे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. सध्‍या उद्भवलेल्या कोरोना महामारी संकटाच्या काळात क्षेत्रीय देशांना आवश्यक असणारी मदत करून संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘मिशन सागर’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेची जबाबदारी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सरकारमधल्या इतर संबंधित संस्था- विभाग मिळून संयुक्त समन्वयाने पार पाडत आहेत.

मिशन सागर मोहिमेवर गेलेले भारतीय नौदलाचे ‘केसरी’ जहाज मालदीव प्रजासत्ताकातल्या माले बंदरात प्रवेश करणार आहे. तिथं ६०० टन अन्नसामुग्री देण्यात येणार आहे. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये अतिशय दृढ ऋणानुबंध आहेत तसेच दोघेही चांगले सागरी शेजारी आहेत. उभय देशांमध्ये संरक्षण आणि मुत्सद्दी संबंध उत्तम आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा