पुणे २१ नोव्हेंबर २०२४ : गिरिप्रेमी ही भारतातील एक अग्रगण्य गिर्यारोहण संस्था आहे. संस्थेच्या गिर्यारोहकांनी २ सप्टेंबर २०२३ रोजी उत्तराखंड मधील गढवाल हिमालयातील ‘माऊंट मेरू’ या ६६६० मीटर उंचीच्या शिखरावर यशस्वी चढाई केली होती. अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील सर्वात पहिली गिर्यारोहण संस्था ठरली. या मोहिमेवर आधारित ‘The Ascent of Mt. Meru’ फिल्म संस्थेतर्फे तयार करण्यात आली होती.
‘The Ascent of Mt. Meru’ या फिल्मला जगातील अनेक फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये नामांकने मिळाली आहेत. यापैकीच एक ४१ वर्षांची परंपरा असलेला ‘टोरेल्लो माऊंटन फिल्म फेस्टिवल’ काल २० नोव्हेंबर रोजी स्पेन येथील टोरेल्लो शहरात पार पडला. या फिल्म फेस्टिवल मध्ये संपूर्ण जगातून काही निवडक अशा उत्कृष्ट दर्जाच्या गिर्यारोहण मोहिमांवर आधारित फिल्म दाखवल्या जातात. यामध्ये भारतातून ‘The Ascent of Mt. Meru’ या फिल्मची निवड करण्यात आली होती. या फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्व गिर्यारोहकांनी व प्रेक्षकांनी सदर फिल्मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या फिल्मचे दिग्दर्शक रोनक सिंग आणि मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांना या फिल्म शो करिता टोरेल्लो, स्पेन येथे आमंत्रित करण्यात करण्यात आले होते. “जगभरातील १८० फिल्म्स मधून एका गिर्यारोहण मोहिमेच्या मराठी भाषेतील फिल्मची निवड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आली ही सर्व गिर्यारोहक आणि भारतीयांसाठी खूप अभिमानाची बाब आहे” असे मनोगत उमेश झिरपे यांनी या फिल्म नंतर व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी