नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2022: ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर इंडियानंतर आता केएफसी इंडियाला विरोध सुरू झाला आहे. ट्विटरवर #BoycottKFC ट्रेंड सुरू आहे. वास्तविक, KFC ने आपल्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये काश्मीर हे सर्व काश्मिरी लोकांचे असल्याचं म्हटलं होतं. आणखी एका व्हायरल चित्रात, KFC ने काश्मीर दिनानिमित्त सांगितलं की, आम्ही सर्व काश्मिरींच्या पाठीशी उभे आहोत. तथापि, जेव्हा ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मवर विरोध सुरू झाला तेव्हा केएफसी इंडियाने माफी मागितली.
केएफसी इंडियाने म्हटले आहे, “देशाबाहेरील काही केएफसी सोशल मीडिया चॅनेलवर प्रकाशित झालेल्या पोस्टबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही भारताचा आदर करतो आणि सर्व भारतीयांची सेवा करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर ठाम आहोत.”
त्याचवेळी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विट केलं की, मी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना केएफसी इंडियावर गंभीर कारवाई करण्याचे आवाहन करतो. त्यांनी KFCला त्यांचं आउटलेट बंद करण्यास सांगितलं. त्यांना भारतात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. यावर भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनीही नाराजी व्यक्त केलीय.
यापूर्वी दक्षिण कोरियाची ह्युंदाई कंपनी कालपासून अचानक वादात सापडली होती. काश्मीरवरील एका वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावर कंपनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली. यानंतर कंपनीला निवेदन जारी करून स्पष्टीकरण द्यावं लागलं.
वास्तविक शनिवारी Hyundai Pakistan नावाच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली. त्या पोस्टमध्ये काश्मीरबाबत पाकिस्तानच्या भूमिकेच्या बाजूने लिहिलं होतं. त्या हँडलची पडताळणी झालेली नसली तरी ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. भारतीय वापरकर्त्यांना हे आवडले नाही आणि काल सकाळपासून #BoycottHyundai ट्विटरवरून गुगल आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे