इस्लामाबाद, ५ ऑगस्ट २०२० : नेपाळ प्रमाणेच आता पाकिस्तानने देखील एक विवादित नकाशा जाहीर केला आहे. ज्यामध्ये काश्मिर, लद्दाख, जूनागढ या भागांना आपला प्रदेश असल्याचा दावा केला आहे. मागच्या वर्षी भारताने काश्मीरमधील कलम ३७० पाच ऑगस्ट रोजी रद्द केला होता. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आदल्या दिवशी म्हणजेच काल ४ ऑगस्ट रोजी हा विवादित नकाशा जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे आज ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पाकिस्ताननी केलेल्या या कृत्याला आता भारताने उत्तर दिले आहे. भारताच्या विदेश मंत्रालयाने म्हटले की, पाकिस्तानने जारी केलेला हा पॉलिटिकल मॅप आम्ही बघितला आहे. पाकिस्तानचा हा दावा (ज्यामध्ये काश्मीर, लडाख, जूनागढ) खोटा आणि हास्यास्पद आहे. पाकिस्तानने केलेल्या या दाव्याची कोणतेही कायदेशीर तथ्य नाही तसेच जागतिक स्तरावर देखील याला मान्यता नाही.
विदेश मंत्रालयाने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पाकिस्तानचे हे कृत्य केवळ सीमेपलीकडील आतंकवादाच्या सहाय्याने आपला क्षेत्रीय विस्तार करण्याचा मनसुबा दर्शवत आहे. पाकिस्तानच्या विचारांची वास्तविकता या कृतीतून स्पष्ट होत आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनीही पाकिस्तानच्या या कृत्यावर निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, कश्मीर लडाख आणि जुनागड यांना आपल्या नकाशा मध्ये समावेश करून घेणे ही केवळ एक हास्यास्पद गोष्ट आहे. मला हे आठवण करून द्यायचे आहे की १९४८ मध्ये सरदार पटेल यांच्या अथक प्रयत्नांमुळे जुनागडमधील लोकांनी एकमताने भारताचा भाग होण्याची निवड केली.
अहमद पटेल पुढे म्हणाले की काल्पनिक नकाशे प्रकाशित केल्यास वस्तुस्थिती उलट होणार नाही. या निर्बुद्ध प्रयत्नांमुळे पाकिस्तानच्या वाईट गोष्टींचा पर्दाफाश होतो. जम्मू-काश्मीर, लडाख आणि जुनागड हे भारताचे अविभाज्य भाग आहेत.
नेमके घडले काय
पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने मंगळवारी वादग्रस्त नकाशाला मान्यता दिली आहे. या नवीन नकाशा मध्ये पाकिस्तानने भारतीय हद्दीतील कश्मीरला आपला भाग म्हणून संबोधित केले आहे. यापूर्वी पाकिस्तान केवळ पीओके ला आपला भाग म्हणून संबोधित करत होता. याच बरोबर गुजरात मधील जुनागड आणि लडाख या भागांवर देखील आपला हक्क दर्शवला आहे.
पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यास पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस म्हणून संबोधले. इम्रान खानच्या मंत्रिमंडळात हा वादग्रस्त नकाशा मंजूर झाला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर इम्रान खान यांनी नवीन राजकीय नकाशा जाहीर केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी