मुंबई, २८ जुलै २०२३ : पहिली बैठक पाटणा आणि दुसरी बैठक बंगळुरू येथे यशस्वी झाल्यानंतर, आता इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक असेल. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी या बैठकीचे आयोजक असतील. या बैठकीची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या दोन्ही बैठका यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या बैठकीत काय निर्णय होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मुंबई मध्ये इंडिया आघाडीची ही बैठक पवई येथील सप्त तारांकित वेस्ट ईन हॉटेल मध्ये होणार आहे. या बैठकीला इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. इतर विरोधी पक्षही या बैठकीला येतात का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीत चर्चेतून आघाडीचे नाव ठरवण्यात आले. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली होती. आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीच्या संयोजकाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संयोजकपदाच्या शर्यतीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीचे संयोजक म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. बंगळुरूतील बैठकीत संयोजक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण तसे घडले नाही. त्यामुळे मुंबईतील बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की संयोजक म्हणून नवीन कोणाचे नाव सूचवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीच्या मागील दोन्ही बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील बैठकीतही लोकसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच आघाडीत कोणत्या कारणाने धुसफूस होऊ नये याबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या शिवाय आघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात येत आहे. आघाडीच्या या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर