नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२३: यूएस मधील भारतीय डायस्पोरांना एकत्र आणण्याच्या दिशेने काम करणाऱ्या इंडियास्पोरा संस्थेने बुधवारी जाहीर केले की, ते २०४७ पर्यंतच्या भारताच्या प्रवासात, भारतीय डायस्पोराच्या भूमिकेवर विचारमंथन करण्याची योजना आखत आहेत. संस्थेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, इंडियास्पोरा जी-२० फोरम २२ ऑगस्टपासून होणार असून तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात परराष्ट्र धोरण, आर्थिक समावेशन, हवामान बदल, लैंगिक समानता, आरोग्यसेवा, धर्मादाय, उद्योजकता, क्रीडा, व्यवसाय आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा केली जाईल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील प्रभावशाली लोकांना बोलावले जाईल.
इंडियास्पोरा-भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकुमार नायर म्हणाले, इंडियास्पोरा जी-२० फोरम जागतिक स्तरावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याची एक अनोखी संधी सादर करत आहेे. या कार्यक्रमाचे आयोजन करून, सीमा ओलांडणारे ठोस उपाय तयार करणे आणि सहकार्य वाढवणे हे आमचे ध्येय आहे. हे व्यासपीठ सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अर्थपूर्ण वारसा जपण्याच्या, भारतीय डायस्पोराच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे.
याचे कार्यकारी संचालक संजीव जोशीपुरा म्हणाले, भारताने जी-२० अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे इंडियास्पोरा जी-२० फोरमचे आयोजन करण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. भारताच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करण्याच्या प्रवासात आपण कसे योगदान देऊ शकतो यावर विचारमंथन करण्यासाठी इंडियास्पोरा २५ देशांतील २०० प्रभावशाली व्यक्तींना आमंत्रित करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड