मेक्सिको शहरात अंदाधुंद गोळीबार

मेक्सिको, ६ ऑक्टोंबर २०२२ : काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनांत वाढ झालेली आहे. या घटनांना थांबवण्यासाठी अमेरिकी सरकारने कठोर निर्णय घेण्याचे सूतोवाच केले होते. असे असतानाच येथील मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात गोळीबाराची घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला, काही वेळ थांबून त्याने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन येथील सिटी हॉल परिसरात झालेल्या या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली असून लॉस टेक्विलेरोस या गुन्हेगारी टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या टोळीच्या सदस्यांनी तसा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रदर्शित केला आहे.

या व्हिडिओ मध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक तसेच गोळीबारामुळे भिंतींची झालेली दुर्दशा स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यात महापौर, माजी महापौर, काही पोलीस अधिकारी तसेच सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यास उशीर व्हावा म्हणून हल्लेखोरांच्या साथीदारांनी रस्त्यात वाहने उभी केली होती. पण येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी हा हल्ला कोणी केला, हे अद्याप सांगता येणार नाही, असे सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा