लोणी काळभोर, दि. २८ जून २०२० : जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात कोरोनाचा ससंर्ग वाढण्याची भीती. पूर्व हवेली तालुक्यात अवैध जुगाराच्या अड्ड्यामुळे परिसरात कोरोना ससंर्गाचा फैलाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बड्या हॉटेलमध्ये जुगार खेळणा-यांपैकी बरेच कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास शेकडो लोकांनी कोरोना चाचणी करण्यासाठी कोविड सेंटर कडे धाव घेतली आहे.
गेल्या चार ते पास दिवसापूर्वी पुणे सोलापूर रोडवरील एका बड्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. फक्त जुगार खेळणारेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील कोरोनाबाधित झाले होते.
हे एवढ्यावरच न थांबता त्यात अनेकजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, हॉटेलमध्ये ये जा करणाऱ्या चार नामांकीत पाहुण्यांसह एक आचारी , असे पाच जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
एका जुगार अड्ड्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.ग्रामीण भागात चालणाऱ्या जुगरापायी परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले असताना मात्र पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.लॉकडाऊन काळात हॉटेल ,लॉज बंद असतानादेखील हा पत्त्याचा डाव कोणाच्या आशिर्वादामुळे चालू होता असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. आर्थिक लोभापायी पोलीस प्रशासनाने सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहेत. या महामारी रोगामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले असताना मात्र लोणी काळभोर पंचक्रोषीत अवैध धंदे जोमात चालू करण्यात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या वर पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी संबधितावर कारवाई करून लोणी काळभोर पोलीस प्रशासनावर कारवाई करणार का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे