गोल पोस्ट गुन्हा ‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज च्या सुटकेचे निर्देश ; तब्बल १९ वर्षांनंतर होणार...

‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराज च्या सुटकेचे निर्देश ; तब्बल १९ वर्षांनंतर होणार सुटका

काठमांडू, २२ डिसेंबर २०२२ गुन्हेगारी जगात ‘बिकिनी किलर’ या नावाने कुप्रसिद्ध असलेला फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या ( वय ७८) सुटकेचे निर्देश नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. गेली १९ वर्ष चार्ल्स शोभराज नेपाळच्या तुरुंगात असून, आरोग्याच्या मुद्द्यावर त्याची सुटका करण्यात येत आहे. दोन अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपाखाली चार्ल्सला २००३ मध्ये नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती.

‘द सर्पंट’ व ‘बिकिनी किलर’ या सारख्या नावाने कुख्यात असलेल्या चार्ल्स शोभराजवर भारतासह थायलंड आणि तुर्कीमधील २० पेक्षा जास्त महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्या मुक्ततेच्या आदेशानंतर त्याच्या डिपोर्टेशनचे आदेशही देण्यात आले आहेत.

नेपाळमध्ये झाली होती अटक

शोभराजने १९७५ मध्ये कोनी जो बोरोन्झिच आणि लॉरेंट कॅरियर या दोन अमेरिकी पर्यटकांची नेपाळमध्ये हत्या केली होती. त्यानंतर तो नेपाळमधून फरार झाला. २००३ त्याने बनावट पासपोर्टच्या आधारे पुन्हा नेपाळमध्ये प्रवेश केला. २००३ मध्ये शोभराज नेपाळमधील एका कॅसिनोबाहेर दिसून आला होता. त्यानंतर काठमांडू पोलिसांनी त्याला अटक केली. अमेरिकी पर्यटकांची हत्येच्या आरोपाखील त्याला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने २१ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय आणि आई व्हिएतनामी होती. चार्ल्स भारतात फिरायला आलेल्या परदेशी महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून नशेची औषधं द्यायचा. यानंतर त्यांच्यासोबत प्रेमसंबंध बनवून त्यांची हत्या करायचा. शोभराजला १९७६ मध्ये भारतातही अटक करण्यात आली होती. तसेच त्याला सर्वोच्च न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, तो १९८६ मध्ये तिहार तुरुगांतून पळाला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version