पुणे, ३ जून २०२३ : इतर धर्माच्या लोकांनी लग्न करायला हरकत नाही. मात्र आजकाल महिलांना खोटे आश्वासन देऊन फसवले जात आहे. आधीच विवाहित लोक ओळख लपवून महिलांना फसवतात. अशा प्रकारे लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. लव्ह जिहादबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क आहे. यावर आम्ही कठोर कायदा आणण्याच्या तयारीत आहोत. विविध राज्यांच्या कायद्यांवर संशोधन सुरू झाले आहे. अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांवर आपली प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस आज (३ जून, शनिवार) पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या संदर्भात विचारले असताना ते म्हणाले की, राज्यातून बेपत्ता होत असलेल्या महिला आणि लव्ह जिहादच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकार अत्यंत संवेदनशील आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास, हरवलेल्या महिलांचा शोध घेण्याच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये प्रशासनाला यश आले आहे. काही ठिकाणी हा आकडा ९५ टक्क्यांपर्यंत आहे.
महाराष्ट्रात सध्या बाल तस्करीच्या बातम्यांबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, गृहखातेही बाल तस्करी रोखण्यासाठी अत्यंत गंभीर आहे. आम्ही सातत्याने मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहोत. बाल तस्करीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने जितकी कारवाई केली आहे तितकी अन्य कोणीही केलेली नाही. महाराष्ट्रात ते कोणत्याही परिस्थितीत थांबवण्याचे काम सुरू आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड