नवी दिल्ली : भारताच्या शिफारशीमुळे आंतरराष्ट्रीय चहा दिवस १५ डिसेंबरऐवजी आता २१ मे रोजी साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्र महासभेने घेतला आहे.
डिसेंबरऐवजी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यासंदर्भात हिंदुस्थानने चार वर्षांपूर्वी मिलान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. त्याला आता यश आले आहे.
सध्या दरवर्षी १५ डिसेंबरला चहा उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो. यामध्ये हिंदुस्थानसह नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, टांझानियाव्यतिरिक्त अनेक देश सामील आहेत. मात्र याची सुरुवात एका एनजीओने केली होती.
चहा उत्पादनासाठी मे महिना सर्वोत्तम असल्याने हा महिना निवडण्याची मागणी हिंदुस्थानने केली होती.
संयुक्त राष्ट्राने सर्व सदस्य देश, आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांना आवाहन आहे की, त्यांनी दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करावा. यामध्ये असे कार्यक्रम करावेत. ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यात चहाचे महत्त्व अधोरेखित होऊ शकेल. यापूर्वी हिंदुस्थानच्याच शिफारशीवरूनच २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून निवडला होता.
याबाबत संयुक्त राष्ट्र महासभेने अधिसूचनेमध्ये म्हटले की, संयुक्त राष्ट्राला विश्वास आहे २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस घोषित केल्यामुळे उत्पादन आणि खपवाढीला चालना मिळेल. जे ग्रामीण भागात भूक आणि गरिबीसोबत लढण्यासाठी फायदेशीर ठरेल. संयुक्त राष्ट्र महासभेने चहाच्या औषधी गुणांसोबत सांस्कृतिक महत्त्वालादेखील मान्यता दिली आहे.