पुणे, ०६ ऑगस्ट २०२२: पुणे आरटीओची इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची इंटरनेटची सुविधा मागील तीन दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे नागरीकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
महिन्याभरात दुसऱ्यांदा ही सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे छोट्या आणि किरकोळ कामासाठीही नागरीकांना विनाकारण चकरा माराव्या लागत आहे. ताटकळत नागरीक वाट पाहण्याशिवाय काहीही करु शकत नाही. शुक्रवारीदेखील येथील इन्टरनेट बंद होती. काम होणार नाही, उध्या या, अशी उडवाउडवी करत अधिकारी-कर्मचारी करताना दिसून येत होते.
आरटीओ परीसरात मेट्रोचे काम सूरु असल्याने इंटरनेटची समस्या वारंवार होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचा दावाही अधिकारी सांगत आहेत. तर येथे बीएसएनएलचे इन्टरनेट वापरले जाते. मात्र बीएसएनएलच्या सेवेत समस्या असल्याचा सूर अधिकारी काढत आहेत.
एकूणच काय ते कधी बीएसएनएलवर तर कधी मेट्रोवर खापर फोडून अधिकारी-कर्मचारी मोकळे होत असले तरी सामान्यांच्या कामाचा मात्र खोळंबा होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर