प्रज्ञा शिंदे, न्यूज अनकट प्रतिनिधी
विद्रोहापासून संवेदनशीलतेकडे :
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
तुमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसं
चौकाचौकातून
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच
तर आजही फ़िरवला जातो नांगर
घरादारावरुन
चिंदकातले हात सळसळलेच
तर छाटले जातात आजही
नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी मरेपर्यंत रहायचं का असंच
युद्धकैदी?
आजच्या काळातही ही कविता जशीच्या तशी लागू होते , ही एक नव्हे अशा अनेक कविता या सत्तेत जीव का रमत नाही याच हुबेहूब स्पष्टीकरण देतात, लेखणीत अंगार ओतून समजाव्यावस्थेला जाब विचारणारा हा कवी आहे, नामदेव ढसाळ ..
त्यांच्या लेखणीतील शब्द हे रागाने धगधगणारे होते; पण त्या रागामागे खोल आत्मीयता आणि एक समाज सुधारणेची आस होती. ढसाळांना फक्त दलितांच्या नव्हे तर साऱ्या शोषितांच्या दुःखाची जाणीव होती म्हणूनच त्यांची कविता केवळ एक विद्रोह नसून माणसाला माणूस म्हणून उभं करण्याची धडपड होती. माणसाने माणसास माणूस म्हणून पाहावं ही त्यांची आयुष्यभर राहिलेली इच्छा…
कमाठीपुरासारख्या भागामध्ये वाढलेल्या ढसाळांनी लहानपणीपासूनच रक्तपात,अन्याय,गरिबी पाहिली होती, म्हणून तो सगळा संघर्ष त्यांच्या नसानसात भिनला होता आणि त्यातूनच जन्म झाला एका विद्रोही साहित्यिकाचा त्याचंच नाव नामदेव ढसाळ आणि सेन्सर बोर्ड सहज म्हणून जातंय की कोण नामदेव ढसाळ ?
आज आपण डोळ्यावर झापड लावलेल्यांसाठी नामदेव दसाळ नावाच्या वादळाचा परिचय घेवून आलो आहोत.
‘गोलपीठा’ या कविता संग्रहातून दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणणारे… दलित, गोरगरिबांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात दलित पँथरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसणारे पद्मश्री, विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचा जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील सर्व कविता काढून मगच प्रदर्शित कराव्यात अशी अट निर्मात्यांसमोर ठेवली. इतकच नाही तर त्यांनी थेट ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ढसाळ कोण? :


मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणजे नामदेव ढसाळ. निधड्या छातीचा राजकीय नेता म्हणजे नामदेव ढसाळ. तरुणांसाठी दीपस्तंभासारखे व्यक्तिमत्त्व म्हणजे नामदेव ढसाळ. साठीच्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले.
नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुण्याजवळील पूर या छोट्या गावी झाला. त्यांच्या आईचं गाव कनेरसर. ही दोन्ही गावं नदीच्या दोन्ही तीरावर आहेत, पुण्यापासून ४० किमी अंतरावर. ढसाळ लहानपणीच वडिलांसोबत मुंबईत आले. इथल्या गोलपिठात त्यांनी वास्तव्य केलं. त्यांचे वडील खाटीकखान्यात खाटीक म्हणून काम करत. ढसाळांचं पाचवीपासूनचं शिक्षण मुंबईतच झालं. दहावीनंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. सुरुवातीच्या काळात ढसाळांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केलं, वेश्यावस्तीतही काम केलं. याच काळात चळवळीकडे ते वळले.
ढसाळ आणि दलित चळवळ
ढसाळ ऐन तारुण्यातच दलित चळवळीकडे आकर्षित झाले. काव्य, गद्य आणि वृत्तपत्रीय स्तंभलेखनातून त्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार प्रभावीपणे मांडले. साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडणारे नामदेव ढसाळ दलित चळवळीचे बिनीचे शिलेदार होते. “दलित पॅंथर’ या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. दलित चळवळीतील समवयस्क सहकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी 1972 मध्ये “दलित पॅंथर’ची स्थापना केली. अमेरिकेतील “ब्लॅक पॅंथर’ चळवळीपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. दलितांसाठीचे अनेक प्रश्न त्यांनी हिरिरीने मांडले. कालांतराने या चळवळीत फूट पडली. अनेक नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. मात्र, “दलित पॅंथर’शी ढसाळ यांचं नातं अखेरपर्यंत कायम होते.
आंबेडकर चळवळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सगळ्या अनुभवांची चिकित्सा केली आणि त्यातून त्यांची कविता अधिक क्रांतिकारी होत गेली. तिथून पुढे त्यांचे जीवन एक संग्राम बनले. साठीच्या दशकाच्या शेवटी महाराष्ट्रात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत होते; पण त्यांची कुणीही दखल घेत नव्हते. त्या वेळी रिपब्लिकन पक्ष एकतर विकलांग झालेला होता किंवा तो सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलेला होता. अशा स्थितीत नामदेवरावांसह अनेक तरुण लेखक एकत्र आले आणि त्यांनी “ब्लॅक पॅंथर’च्या धर्तीवर “दलित पॅंथर’ संघटना स्थापन केली. ज्या गावात अत्याचार व्हायचे, तेथे “दलित पॅंथर’ उग्र आंदोलन करायची. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात “दलित पॅंथर’चा दरारा वाढला आणि अन्याय, अत्याचारही कमी होत गेले.
वाचनाचा दांडगा व्यासंग
नामदेवरावांचे वाचन विविधांगी होते. ते जसे वैचारिक लेखन वाचत, तसे मार्क्सवाद, इंग्रजीसह इतर साहित्याचीही आवडीने दखल घेत. या वाचनातून आणि अनेक मित्रांच्या चर्चेतून त्यांचे विचार घडत गेले. त्यांच्या लेखनाचे वेगवेगळ्या देशांतूनही स्वागत व्हायचे. वक्तृत्वाने अनेक माणसे खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यामुळे ते दलित “मासेस’चा पुढारी झाले. तरुणवर्ग त्याच्याकडे अधिक आकर्षित होत गेले.
ढसाळांचे लेखन
साहित्यिक तळातल्या वर्गाचे सखोल लेखन करतो तेव्हा तो व्यक्तीकडून समिष्टीकडेच जात असतो. नामदेव ढसाळ यांनी आपल्या सर्व प्रकारच्या लेखनातून एकूण समाजाचाच विचार केला. त्यामुळेच ढसाळांनी जात-धर्माच्या पलिकडे माणूसकेंद्री लेखन केले.


१७-१८ व्या वर्षांपासूनच ढसाळांनी कविता लिहायला सुरुवात केली. १९७० मध्ये, ते २१ वर्षांचे असताना, एकदा ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत असताना एका काव्यसंमेलनात गेले. मुंबईत ललित लेखक आणि कवी अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन सुरू होतं. संमेलनात अनेक प्रसिद्ध कवी सहभागी झाले होते. काव्यसंमेलन रंगात आलेलं असताना, एक चिठ्ठी प्रेक्षकांमधून व्यासपीठावर गेली. ती चिठ्ठी ढसाळांनीच पाठवली होती, ज्यात ते म्हणाले होते, “मलाही कविता वाचायचीय”.
संयोजकांना त्यावर हसू आलं, “हा गबाळा मुलगा काय कविता वाचणार?” असं वाटून त्यांना थोडासा आढेवेढे घेणं भाग पडलं. ते म्हणाले, “वेळ थोडा उरलाय, अजून काही निमंत्रित कवी बाकी आहेत.” पण श्रोत्यांनी ढसाळांना वाचनाची परवानगी देण्याचं आग्रह धरल्यावर संयोजकांना त्यांना वाचायला परवानगी द्यावी लागली. ढसाळांच्या कविता ऐकल्यावर सर्वच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. ग. दि. माडगूळकर यावेळी म्हणाले, “आता रसाळ नामदेवांचा काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झालाय.”
“ढसाळांची कविता: विद्रोहापासून संवेदनशीलतेकडे”
डिसेंबर १९८० मध्ये ढसाळ आजारी पडले आणि जानेवारी १९८१ मध्ये त्यांना ‘मायस्थेनिया ग्रेविस’ हा आजार असल्याचं निदान झालं. यानंतर पुढील ३०-३२ वर्षे ते या आजाराशी संघर्ष करत होते, तरीही त्यांची कविता लेखनाची जोम कमी झाला नाही.
त्यांच्या साहित्यिक प्रवासात नऊ स्वतंत्र कवितासंग्रह, तीन निवडक कविता संग्रह, दोन कादंब-या, आणि पाच लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘गोलपिठा’, ‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले’, ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी’, ‘तुही यत्ता कंची तुही यत्ता’, ‘खेळ’, ‘गांडू बगिचा’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’, आणि ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ हे त्यांचे प्रमुख कविता संग्रह आहेत. ‘हाडकी हाडवळा’ आणि ‘निगेटिव्ह स्पेस’ या कादंब-या तसेच ‘आंधळे शतक’, ‘आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट’, ‘सर्व काही समष्टीसाठी’ (भाग १ आणि २), ‘बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न’, ‘दलित पँथर – एक संघर्ष’ यासारखे लेखसंग्रहही त्यांचे प्रकाशित झाले आहेत.
त्यांचा शेवटचा संग्रह ‘निर्वाणा अगोदरची पीडा’ एक विशेष महत्त्वाचा ठरतो. या संग्रहातील कविता व्यक्तिगत आणि सामाजिक विद्रोहाच्या पार्श्वभूमीवर समष्टीच्या सनातन दु:खाचे चित्रण करणाऱ्या आहेत. ढसाळ यांची कविता एक महत्त्वाचा प्रवास दर्शवते विद्रोहापासून ते समष्टीच्या दुःखाची मांडणी करणाऱ्या कवितांपर्यंत. तसेच चिंध्यांची देवी आणि इतर कविता या निवडक संग्रहातील कवितांमध्ये ढसाळांच्या पूर्वीच्या कवितांपेक्षा वेगळी संवेदनशीलता आहे. या संग्रहातील स्त्रीविषयक कवितांचा गाभा एक वेगळी जाणीव, संघर्ष आणि अनुभवातून आकार घेतो. ज्या संवेदनशीलतेचा उल्लेख केला जातो, ती केवळ दलित असण्यामुळेच नाही, तर जीवनाच्या विविध अनुभवांतून, विचारांच्या घडलेल्या प्रवासातून आलेली आहे.
धारदार शस्त्रासारखी तीव्रता असलेल्या ढसाळांच्या कवितेत प्रसंगी मृदुता, मुलायमपण आणि कारुण्याचे दर्शन होईल, हे या संग्रहात जाणवते.