दुबई २९ सप्टेंबर २०२०:सोमवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात , रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने सुपर ओवर मध्ये सामना जिंकत मुंबई इंडियन्स संघाला पराजित केले आहे. यंदाची आयपीएल ही वेगळी आहे असे म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येक सामन्यात शेवटच्या चेंडू पर्यंत सामना कोण जिंकेल हे कळून येत नाही आहे. अप्रतिम फलंदाजी अप्रतिम गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण सर्वच पाहायला मिळत आहे.
सामन्यात, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. आरसीबी संघाकडून अारोन फिंच आणि देवधर पडीकल यांनी चांगलीच सुरुवात करून दिली .त्यानंतर आरोन फिंच ५२ धावा करून पैवेलियन मध्ये परतला .त्यानंतर पडिकल सोबत फलंदाजीसाठी आला तो कर्णधार विराट कोहली. यंदाच्या आयपीएल मध्ये कोहलीला फॉर्म गवसलेला दिसून येत नाहीये. या ही सामन्यात तो अवघ्या ३ धावांवर परतला. त्यानंतर पडीकल याच्या ५४ धावा आणि डीविलिअर्स च्या ताबडतोड नाबाद ५५ धावांच्या जोरावर आरसीबी संघाने ३ विकेट्स गमावत २०१ धावा केल्या.
२०२ धावांचा पाठलाग करतना मुंबई इंडियन्स संघाचे ओपनींग फलंदाज स्वस्तात परतले. त्यानंतर सामना हातातून जातो की काय असे वाटू लागले. परंतु आयपीएल २०२० मधील पहिलाच सामना खेळत असलेला ईशान किशन याने ताबडतोड ९९ धावा केल्या. यासोबतच कायरोन पोलार्ड याने किशन सोबत मिळून शतकीय पार्टनरशिप करत सामना बरोबरीत संपवला.
सुपर ओवर मध्ये फलंदाजी साठी आलेले मुंबई इंडियन्स संघाने अवघ्या ७ धावा केल्या. ८ धावांचा पाठलाग करण्यासाठी आरसीबी संघाकडून डीविल्यर्स आणि विराट कोहली आले. आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारत आरसीबी संघाला विजय मिळवून दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे