IPL Restart and Time Table : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. यंदाच्या स्पर्धेतील अंतिम सामना हा 25 मे रोजी खेळवला जाणार होता. मात्र, भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अंतिम सामना बीसीसीआय पुढे ढकलणार असल्याचे सांगितले जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार हाच सामना 30 मे रोजी खेळवला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. याशिवाय येत्या 16 मे पासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होऊ शकते असे देखील म्हंटले जात आहे.
आयपीएल 2025 मध्ये 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 58 सामने पूर्ण खेळवण्यात आले आहेत. तर 16 सामने अजून शिल्लक आहेत. जे चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहिती नुसार आज संध्याकाळपर्यंत आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने माहिती देताना सांगितले की, “आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली असून या स्पर्धेचा अंतिम सामना हा 25 एवजी 30 मे रोजी खेळवला जाऊ शकतो. याशिवाय सुरक्षेच्या मुद्यावरून ही स्पर्धा आता मर्यादित ठिकाणीच खेळवण्यात येणार आहे. आज रात्री पर्यंत सर्व संघाना सुधारित वेळापत्रक पाठवले जाईल.”
याशिवाय बीसीसीआयकडून पंजाब वगळता सर्व संघातील खेळाडूंना येत्या मंगळवारपर्यंत आपल्या ठिकाणी हजर राहण्याचे सांगितले आहे. कारण येत्या शुक्रवारपर्यंत आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. काही संघातील खेळाडू आणि स्टाफ हे मायदेशी परतले आहेत. आता त्या खेळाडूना पुन्हा बोलवण्याचे आदेश बीसीसीआयने फ्रेंचायझीना दिले असल्याचे सांगितले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी,प्रथमेश पाटणकर












































