तेहरान, ५ फेब्रुवरी २०२१: पाकिस्तानमध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी इराणने हा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने (आयआरजीसी) पाकिस्तानमध्ये प्रवेश करून आपल्या सैनिकांना सोडवले असल्याचे सांगितले जात आहे. तिथल्या दलाने एका निवेदनात दावा केला आहे की, दोन सैनिकांना पाकिस्तानमध्ये केलेल्या गुप्तचर ऑपरेशनमध्ये वाचविण्यात आले आहे.
दक्षिणपूर्व इराणमधील आयआरजीसी ग्राऊंड फोर्सच्या क्यूयूडीएस बेसने एका निवेदनात म्हटले आहे की, “अडीच वर्षांपूर्वी जैश-उल-आदल संघटने द्वारा त्यांच्या दोन सीमा रक्षकांना कैद केले गेले होते, त्यांना सोडण्यासाठी मंगळवारी रात्री यशस्वी ऑपरेशन केले गेले.” या कारवाईत दोन्ही रक्षकांची सुटका करण्यात आली. निवेदनानुसार सैन्य इराणमध्ये सुखरुप परत पाठविण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की गुप्तचर माहितीच्या आधारे इराणच्या आयआरजीसीने पाकिस्तानमध्ये ही कारवाई केली आहे.
या अहवालानुसार, पाकिस्तानच्या कट्टरपंथी वहाबी दहशतवादी संघटना ‘जैश-उल-अदल’ ने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी बलुचिस्तान प्रांतातील मेरकवा शहरात पाकिस्तानी हद्दीत १२ आयआरजीसी रक्षकाचे अपहरण केले होते. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी पाच सैनिकांना सोडण्यात आले. यानंतर २१ मार्च २०१९ रोजी आणखी चार इराणी सैनिकांना पाकिस्तानी सैन्याने सोडले होते.
वृत्तानुसार बलुचिस्तान प्रांतात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी इराणने सर्जिकल स्ट्राईकद्वारे आपल्या दोन सैनिकांना दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून सोडवले.जैश-उल-अदल ही घोषित दहशतवादी संघटना आहे. जी प्रामुख्याने आग्नेय इराणमध्ये सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेने इराणमधील अनेक नागरी आणि सैन्य तळांवर हल्ला केला आहे. या संघटनेने बलुचिस्तानमध्येही नरसंहार केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे