इराणचा भारताला मोठा धक्का, या प्रकल्पातून केले बाहेर

इराण, दि. १४ जुलै २०२०: भारत आपल्या जागतिक स्तरावरील हितसंबंधांमध्ये कमकुवत होत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवत आहे. नेपाळ सारखा देश भारताच्या हातातून गेला. त्यानंतर श्रीलंकेमध्ये देखील भारताने विमानतळामध्ये हिस्सेदारी घेण्याचे ठरवले होते. मात्र श्रीलंकेने देखील या गोष्टीला आता जवळपास नकारच दिला आहे आणि आता यातच इराणकडून देखील भारताला मोठा धक्का मिळाला आहे. चबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेलगत हा रेल्वे मार्ग तयार केला जाणार होता. तथापि चाबहार पोर्ट विषयी फारसा परिणाम या रेल्वेमार्गाच्या करारामुळे होणार नसला तरीही भारताने अमेरिकेविरुद्ध जावून इराण सोबत तेल खरेदी थांबवली त्यामुळे भविष्यात चाबहार पोटचे देखील असेच होते की काय ही भीती निर्माण झाली आहे. चाबहार पोर्ट हा मार्ग भारतला अफगाणिस्थान व त्यापुढील देशांसोबत व्यापार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाविषयी बोलायचे झाले तर इराणने यासाठी असे कारण दिले आहे की भारताकडून या प्रकल्पासाठी दिरंगाई होत आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारा निधी देखील भारताकडून अद्याप वेळेमध्ये मिळालेला नाही. त्यामुळे इराणने आता स्वत:च या प्रकल्पामध्ये निधी टाकण्याचे ठरवले आहे व हा प्रकल्प स्वतः पूर्ण करण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प भारताच्या हातातून गेल्यात जमा आहे.

गेल्या आठवड्यात इराणचे वाहतूक आणि शहर विकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांच्या हस्ते ६२८ किमी लांबीच्या चाबहार – जाहेदान रेल्वे मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानच्या जारांजपर्यंत जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इराण रेल्वे विभाग भारताच्या कोणत्याही मदतीविना हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी राष्ट्रीय विकास निधीची वापर करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा