PCMC Irregularities in Tender Process: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने काढलेल्या जलशुद्धीकरण पंप हाऊस चालवण्याच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. एकाच कामासाठी दोन निविदा काढल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे.
निविदा प्रक्रियेतील संशयास्पद अटी
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात निविदा प्रक्रियेतील काही अटी निवडक ठेकेदारांना अनुकूल असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः क्रमांक (१) ची अट अन्यायकारक असून, ती महाराष्ट्र शासनाच्या निविदा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी आहे. या अटींमुळे सर्वसामान्य ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकाच कामासाठी दोन निविदा;
जलशुद्धीकरण पंप हाऊस चालवण्यासाठी नुकतीच एक निविदा काढून कामाचे आदेश देण्यात आले आहेत. या कामाची मुदत १८ महिने असताना, पुन्हा एकदा त्याच कामासाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे. एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढल्याने प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
निविदा किमती वाढण्याची शक्यता
निविदा प्रक्रियेत मोजकेच ठेकेदार सहभागी झाल्यामुळे त्यांच्या संगनमताने दर ठरवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे स्पर्धा कमी होऊन निविदा किमती वाढण्याची शक्यता आहे. निविदा प्रणालीच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निविदा ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी काढले जात आहेत का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
चौकशीची मागणी
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या निविदा प्रक्रियेमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे