वसई-विरार, दि. २१ जुलै २०२०: वसई-विरारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिस्तीचे कडक पालन हे सध्या वसई-विरारमध्ये केले जात आहे. मात्र यातच कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. अश्याच कर्मचाऱ्यांना वसई-विरारच्या आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.
कामात कुचराई करणाऱ्या ६ बेशिस्त कर्मचाऱ्याांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर ९ ठेका मजुरांना सेवेतून कमी करण्याचे आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. याशिवाय बेजबाबदारपणाबद्दल एक वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, एक लिपिक आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक व एक मुकादम यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या तोंडच पाणी पळाल आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत आणि यात जवळपास २०० सफाई कर्मचाऱ्यांची व ठेका पद्धतीने घेतलेल्या ठेका मजुरांची महानगरपालिकेच्या अलगीकरण व विलगीकरण केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक करण्यात आली होती.
परंतु या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी दिलेल्या केंद्रात हजर झालेच नाहीत आणि काही कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर गैरहजर राहत आहेत.
त्यामुळे अलगीकरण व विलगीकरण केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या संदर्भात महापालिका मुख्यालयात आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी अलगीकरण व विलगीकरण केंद्रांची जबाबदारी नेमून दिलेल्या स्वच्छता निरीक्षक, मुकादम व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक आयोजित केलेली होती आणि या आढावा बैठकीत या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आणि तात्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनीधी: राजश्री वाघमारे